देवगड : पक्ष्यांच्या आरोग्यास घातक ठरत असल्याने चायनिज प्लॅस्टिक पतंग व नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातली आहे. याची प्रत्येकाने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आज या पतंग महोत्सवात नायलॉन मांजाचे दहन करून सर्व पतंग प्रेमींना एक संदेश आजच्या कार्यक्रमातून देत आहे असे मत कोल्हापूर सराफ मंडळाचे अध्यक्ष व पतंगप्रेमी बाबासाहेब महाडिक यांनी व्यक्त केले. ते देवगड बीच येथे देवगड व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित पतंग महोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफ मेमन ,उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, मधुकर नलावडे, संजय धुरी, संजय सोमण, मिलिंद मोहिते, मिलिंद मोरये, अजित टाककर, दयानंद पाटील, दिग्विजय कोळंबकर, निलरत्न मालंडकर, मिलिंद खडपकर, लहरिकांत पटेल, शिवप्रसाद पेडणेकर , एकनाथ तेली, बंटी कदम आदीं उपस्थित होते.
महाडिक पुढे म्हणाले देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने मकर संक्रांतीच्या कालावधीत पतंग महोत्सवाचे देवगड बीचवर आयोजन करण्यात येत असते. या पतंग महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी मी देवगडला येत आहे. गेली दहा वर्षे यशस्वी रित्या नियोजन या मंडळाच्यावतीने होत आहे.

गेली दोन वर्षे कोविड कालावधीमुळे हा पतंग महोत्सव होऊ शकला नाही. मात्र यावर्षी होणाऱ्या या पतंग महोत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहून समाधान वाटते असेही ते म्हणाले. देवगड बीचवर होणाऱ्या पतंग महोत्सवामुळे आकाशात विविध रंगांचा नजराना पाहायला मिळाला पालक वर्गासह लहान मुलांनीही या महोत्सवासाठी गर्दी केली होती.





