आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी वरळीत भाजपचे शक्तिप्रदर्शन..! ; भव्य दहीहंडीचे आयोजन.!

39

मुंबई : गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचं राजकारण नक्की कोणत्या दिशेने चाललं आहे, हेच समजायला काही मार्ग दिसत नाहीये. मात्र या सगळ्यांमध्ये एकेकाळचे सक्खे मित्र असलेले शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा हे आता कट्टर वैरी झाले आहेत.

त्यातच आता ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. यंदा पुन्हा एकदा राजकीय दहीहंडी रंगणार असल्याचे पाहायला मिळत आहे. वरळीच्या जांभोरी मैदानात भारतीय जनता पक्ष दहीहंडी उभारणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी त्यासाठीच वरळीत परिवर्तनाची दहीहंडी उभारली जाणार आहे. भाजपने तशी तयारीही केली आहे. या संदर्भात लवकरच मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार घोषणा करतील आणि सविस्तर माहिती देतील. गेल्यावर्षी देखील भाजपने जांभोरी मैदानात दहीहंडीचे आयोजन केले होते. यावर्षी याच मैदानात परिवर्तनाच दहीहंडी साजरी करत भारतीय जनता पक्ष आता डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच वरळीमध्ये मराठी दांडिया, मराठमोळी दिवाळी पहाट भारतीय जनता पक्ष तर्फे साजरी करण्यात आली होती. आता भाजपची पर्यावरणाची दहीहंडी साजरी करण्याची तयारी आहे.