बेळगाव : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला विविध कारणांमुळे विलंब होत आहे. त्यामुळे लवकर सुनावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची लवकर बैठक बोलवावी, अशी मागणी खानापूर, बेळगाव आणि निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची शुक्रवारी माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात २००४ पासून आजपर्यंत प्रलंबित आहे. साक्षी पुरावे नोंदविण्याची सूचना करण्यात आल्यानंतरही २०१७ पासून आतापर्यंत एकदाही सुनावणी झालेली नाही.
तीन सदस्यीय खंडपीठात कर्नाटक व महाराष्ट्राचे न्यायाधीश असतात. या कारणाने सुनावणी लांबणीवर पडत आहे. त्यामुळे पुढील सुनावणीवेळी खंडपीठात दोन्ही राज्यांचे न्यायाधीश येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करावेत, तसेच, सुनावणी लवकर व्हावी यासाठी वकिलांना आवश्यक त्या सूचना कराव्यात, उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या ६६ वर्षांपासून सीमाभागातील जनता कन्नडिगांच्या वरवंट्याखाली भरडली जात आहे, यामधून मुक्तता करण्यासाठी सीमाभागाचे आधारस्तंभ म्हणून तुम्ही पुढाकार घ्यावा. याप्रकरणी लक्ष घालून उच्चाधिकार समितीची बैठक बोलाविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचना करावी व दाव्याला गती द्यावी, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन तातडीने हालचाली करण्यात येतील, असे आश्वासन पवार यांनी दिले. यावेळी खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, सहचिटणीस रणजित पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, रवींद्र शिंदे, म. ए. समिती सदस्य कृष्णा कुंभार, उपाध्यक्ष कृष्णा मन्नोळकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर आदी उपस्थित होते.
प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली भेट
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी पवार यांनी सीमाप्रश्नाला चालना मिळावी यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या जातील, अशी माहिती दिली. यावेळी विनोद आंबेवाडीकर, बाबू कोले, सतीश देसाई, राजू ओउलकर, गोपाळ हंडे आदी उपस्थित होते.





