मराठी शाळा बंद पडू देणार नाही : मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी : विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वळत असल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. मात्र येत्या काळात मातृभाषेत शिक्षण घेणे बंधनकारक करण्याबरोबरच “डिप्लोमा-इंजीनियरिंग” सारखे अभ्यासक्रम सुद्धा मराठीत शिकविले जातील. तसा निर्णय केंद्र स्तरावरच घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडून देणार नाही.असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला.

येथील डि.के.टुरिझम च्या सभागृहात भाजप बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे शिक्षक पदवीधर मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित मेळाव्यात मंत्री केसरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजन तेली,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रीय मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष चिंतामणी तोरस्कर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघाचे सचिव गुरुदास कुसगावकर, राजेंद्र माणगावकर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, बबन उर्फ नारायण राणे आदी उपस्थित होते.

यावेळी केसरकर म्हणाले, विनाअनुदानित शाळा आणि शिक्षक सेवकांसाठी साडेअकराशे कोटीचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे. त्यात शिक्षक सेवकांचे वेतन सुद्धा दुप्पट करण्यात आले आहे. आता येत्या काळात शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत असल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. त्याचे कारण म्हणजे इंग्रजी माध्यमामधून शिक्षण घेतल्यानंतर पुढे प्रगती करता येते अशी येथील पालकांची आणि विद्यार्थ्यांची धारणा झाली आहे. सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यमांचे शिक्षण घेतल्यानंतर डिप्लोमा इंजीनियरिंग सारखे इंग्रजीत शिकवले जाणारे अभ्यासक्रम सोपे होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात पाठविले जाते. मात्र आता हे अभ्यासक्रम सुद्धा मराठीत करण्याचा निर्णय झाला आहे.असे सांगितले.

तेली म्हणाले,शालेय शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचा सर्वाना अभिमान आहे.तुम्ही धाडसी निर्णय घेतले असून आता फक्त एकदा येथील शिक्षणाधिकारी व उपसंचालक याच्याकडे बघण्याची वेळ आली आहे.प्रत्येक शिक्षकाला लहान मोठ्या गोष्टीसाठी वेठीस धरण्याचे काम सुरू असून आता हे कुठेतरी थांबले पाहिजे असेही तेली यांनी सांगितले.या वेळी काळसेकर यांनी म्हात्रे यांच्या कामाचा आढावा घेतला तसेच शिक्षकांचे प्रश्न खऱ्या अर्थाने ते विधानसभेत पोचतील अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घावरे यांनी केले.