सावंतवाडी : तालुक्यातील आरोस येथील आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या वतीने आज रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी श्री देवी माऊली मंदिर येथे संध्याकाळी 7.00 वाजता धर्म संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
संस्कार’म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. ‘गुणांचा गुणाकार’ याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि ‘दोषांचा भागाकार’ याचा अर्थ स्वतःमधील दोष अल्प करायचे. धर्म शिक्षणातून सुसंस्कारी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी, नव्या पिढीला आजच्या तरुणाईला व्याख्यानाच्या माध्यमातून धर्म संस्कार ज्ञात करण्यासाठी धर्मसंस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुसंस्कार घेऊन बाहेर पडणारी तरुण पिढी आज महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता वाईट प्रवृत्तींना बळी पडून वाईट मार्गाला जाते त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, भविष्याच्या दृष्टीने चांगले विचार, आचार व्याख्यानातून कानावर पडावेत आणि सुसंस्कारी पिढी निर्माण व्हावी असा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे.
या कार्यक्रमासाठी व्याख्याते लक्ष्मीकांत कराड, शिवशंभो व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील, तरुण भारतचे उपसंपादक प्रवीण मांजरेकर तसेच लेखक व कवी दीपक पटेकर हे उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी आरोस गावात दुचाकी गाड्यांची चोरी करणाऱ्या चोरांचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या गावातील युवक संदेश देऊलकर आणि योगेश देऊलकर या बंधूंचा सत्कार करण्यात येणार आहे. असेच समाजोपयोगी कार्य करण्यास इतरांना देखील प्रेरणा मिळावी असा या सत्कार सोहळ्याचा उद्देश आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.





