त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी धाडस दाखवलं, पण ..! ; मुश्रीफांवर शरद पवारांची सणसणीत टीका!

52

कोल्हापूरः शरद पवारांची कोल्हापुरात सभा संपन्न झाली. संपूर्ण राज्याचं लक्ष पवार काय बोलतात, याकडे होतं. उपस्थित सर्वच नेत्यांनी जोरदार भाषणं केली. शाहू महाराजांनीदेखील राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. शरद पवारांनी सर्वदूर टीका केलीच परंतु हसन मुश्रीफांना सोडलं नाही.

हसन मुश्रीफ यांना तपास यंत्रणांकडून काही दिवसांपूर्वी नोटिसा आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सत्तापक्षाला समर्थन दिलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. हाच मुद्दा धरुन शरद पवारांनी मुश्रीफांना टार्गेट केलं. त्यांच्या घरातील भगिनींनी धाडस दाखवलं… परंतु त्यांना हे धाडस दाखवता आलं नाही, असं शरद पवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

ईडीच्या नोटिशीला संजय राऊत घाबरले नाहीत, अनिल देशमुख घाबरले नाहीत. परंतु काहींनी भूमिका बदलली. कोल्हापूरचा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे. ईडीची नोटीस आली तर काही लोक सामोरं जातील, असं मला वाटलं होतं. कोल्हापुरात एकाच्या घरी नोटीस आली. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीचे लोक घरी गेले. घरातल्या महिलांनी सांगितलं, ज्या प्रकारे आमच्यावर टीका करताय, हल्ले करताय याच्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला.. एक भगिनी असं म्हणू शकते पण कुटुंबाच्या प्रमुखाने असं कधी म्हटलं नाही. जे धाडस भगिनींनी दाखवलं ते त्यांनी न दाखवता भाजपमध्ये जाणं पसंत केल्याचा घणाघात पवारांनी केला.

ते पुढे म्हणाले की, ईडीची भीती घालून भाजप सत्तेचा गैरवापर करत असेल तर आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे. २०२४ हे निवडणुकीचं वर्ष आहे. मत देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. सत्तेचा गैरवापर कुणी केला, कांद्याचं नुकसान कुणी केलं, ऊस उत्पादकांचं नुकसान कुणी केलं, शेतकऱ्यांना कुणी वेठीस धरलं? हे बदलायचं असेल तर मोदींच्या हातातून सत्ता काढून नव्या पिढीच्या हातात द्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे असं आवाहन शरद पवार यांनी केलं.