श्रीहरिकोटा : चांद्रयान-3 बाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर कशा प्रकारे उतरलं, याचा व्हिडिओ इस्रोने शेअर केला आहे. एक्स पोस्टमधून इस्रोने ही माहिती दिली आहे. विक्रम लँडरमधील लँडर मॉड्यूल कॅमेऱ्याने काढलेला हा व्हिडिओ आहे. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:04 मिनिटांनी ‘चांद्रयान-3’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केलं होतं. यानंतर काही तासांनी त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडलं होते. प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर विविध प्रकारचे संशोधन पार पाडणार आहे.
दरम्यान, काल (24 ऑगस्ट) रात्री देखील इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. लँडर मॉड्यूल हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या थोडा पूर्वीचा हा व्हिडिओ होता. याच व्हिडिओच्या थ्रेडमध्ये इस्रोने आज नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे.
भारताने रचला इतिहास
चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे फत्ते करून भारताने नवा इतिहास रचला आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिलाच देश ठरण्याचा विक्रम भारताच्या नावे झाला आहे. चांद्रयान-3 हे चंद्रावर 14 दिवस विविध प्रकारचे संशोधन करणार आहे.





