दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी. एड बेरोजगारांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुधीर दळवी, अजय परब, समीर ठाकूर उपस्थित होते.
यापूर्वी दिनांक 27 मार्च रोजी 14 दिवसांचे उपोषण सोडवून मंत्री राणे यांनी जिल्ह्यातील स्थानिक डी. एड बेरोजगारांना न्याय देणार म्हणून आश्वासित केले होते. जूनपासून शाळा सुरु होऊन पाच महिने झाले, तरी शाळेला शिक्षक मिळालेले नाहीत. स्थानिकांना त्या शाळेत शिक्षक म्हणून संधी द्यावी यासाठी प्रयत्न झाले; पण स्थानिकांकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे दिसते.
त्यावर लक्ष वेधण्यासाठी डी. एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने मंत्री राणे यांची भेट घेतली. सद्यस्थितीत पवित्र पोर्टल मार्फत राज्यस्तरीय भरती प्रक्रिया असल्याने 2010 प्रमाणे स्थानिकांना पुन्हा डावलण्याची भीती संघर्ष समितीने वर्तवली. 10 वर्ष भरती न झाल्यामुळे येत्या शिक्षक भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांन| संधी नाही मिळाली तर त्यांची वयोमर्यादा संपून याची भीती आहे त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी पोर्टल मधूनच पूर्वीचे कोकण निवड मंडळ स्थापन करुन स्थानिक डी. एड बेरोजगारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यासाठी येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, सचिव यांची मंत्रालय पातळीवर एकत्रित बैठक लावून यावर तोडगा काढू असा शब्द यावेळी मंत्री नारायण राणे यांनी दिला. यावेळी डी. एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने संघटना अध्यक्ष विजय फाले, उपाध्यक्ष स्वराली वाक्कर, सचिव सहदेव पाटकर,शिवप्रसाद नाटेकर, नाना देसाई, दिनेश नाईक, राजेश वाघ, रुबी राणे, प्रमोद डीचोलकर, भाग्यश्री पाठक, उज्वला शेळके, गौरी आडेलकर, रुचिका धुरी, सोनी बिबवणेकर, भाग्यश्री पाताडे, सहदेव पाठकर, शिवाजी डोईफोडे, तेजल डिचोलकर, कोमल खाजवणकर, सुगंधा मोरये, कुणाल कदम, रजनीकांत नार्वेकर, प्रिया परब, तेजल तेली आदी डी. एड बेरोजगार उपस्थित होते.





