उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार ; तर महाराष्ट्रात पुढील तीन दिवस प्रतीक्षा.!

55

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. अंदाजाप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मात्र त्यानंतर पावसाचा जोर पुन्हा ओसरला. अशातच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे पुढचे किमान तीन दिवस तरी राज्यात पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शुक्रवारी म्हणजेच 25 ऑगस्टपासून कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टाही वायव्येला सरकला आहे. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असलं तरीही काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस नाहीच. राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे शेतीच्या कामांचा वेग मंदावला आहे. अनेक भागांमध्ये पाणीकपात पुन्हा एकदा लागू करण्यात आली आहे. तर, मुंबईत उन्हाच्या झळा लागत आहेत.

 

देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार

हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरीही या भागांमध्ये दरडी कोसळण्याचं सत्र सध्या सुरुच आहे. मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे.