मोठी बातमी! राज्यावर दुष्काळाची छाया ; ६०पेक्षा अधिक तालुक्यात २० दिवस पाऊस नाही.

37

सोलापूर : राज्यात एक कोटी ३७ लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली, मात्र ६० पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये २० दिवसांपासून पाऊस नाही. सद्य:स्थितीत २६ पैकी १७ धरणांमधील पाणीसाठा ५५ टक्क्यांपेक्षाही कमी असून पावसाअभावी पाणीपातळी देखील खालावू लागली आहे. खडकाळ, हलक्या व कोरडवाहू जमिनीवरील तब्बल ५७ लाख हेक्टरवरील पिकांना आता पाण्याची नितांत गरज असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

राज्यभरात एक कोटी ४२ लाख हेक्टर एवढे खरीप पिकांखालील क्षेत्र आहे. त्यापैकी एक कोटी ३७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. ८ जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस पडला नव्हता, त्यामुळे उशिराने पेरणी झाली. आता पावसाने १६ दिवसांपासून पुन्हा एकदा ओढ दिल्याने दुबार पेरणी देखील शक्य नाही.

सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका, मटकी, कापूस, भुईमूग अशी पिके आता पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. कोपरगाव, सिन्नर यासह जालना व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये २० दिवसांपासून पाऊसच नाही. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक या विभागांमध्ये अजूनही सरासरीच्या तुलनेत ५५ ते ६० टक्केसुद्धा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत राज्यातील ६० पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्याची वस्तुस्थिती आहे.

आजपासून पावसाची शक्यता: हवामान अंदाज

सध्या १६ दिवसांपासून राज्यात पाऊस पडलेला नाही. आता आगामी आठ-दहा दिवसांत पाऊस न पडल्यास एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ४० टक्के खरीप पिके वाया जाण्याची भीती वर्तविली जात आहे. नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, धाराशिव, यवतमाळ या १३ जिल्ह्यांमधील जवळपास ६० पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती आहे. पावसाअभावी ३८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तरीपण, १८ ऑगस्टपासून विदर्भ, मराठवाड्यातून पावसाला पुन्हा सुरवात होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आता बळीराजाच्या नजरा आकाशाकडे आहेत.

बॅंकांचे खरीपातील कर्जवाटप

  • एकूण उद्दिष्ट
  • ७०,००० कोटी
  • आतापर्यंत कर्जवाटप
  • ५४,००० कोटी
  • अजूनही वाटप नाही
  • १६,००० कोटी
  • हंगामाचे शिल्लक दिवस
  • ३६

खरीप पेरणी अन्‌ पिकांची स्थिती

  • एकूण पेरणी क्षेत्र
  • १.४२ कोटी हेक्टर
  • प्रत्यक्षात पेरणी
  • १.३७ कोटी हेक्टर
  • पेरणी न झालेले क्षेत्र
  • ५ लाख हेक्टर
  • पाण्याची गरज असलेले क्षेत्र
  • ५७ लाख हेक्टर