पाच राज्यांच्या निवडणुकांवर भाजपचे राजधानीत मंथन !

51

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. यात आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात प्रामुख्याने चर्चा झाली.

दिवाळीनंतर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. यापैकी केवळ मध्य प्रदेशमध्येच भाजपची सत्ता आहे. इतर राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार आहेत. या पाच राज्यांच्या निवडणुकीतील प्रचारातील मुद्दे व प्रचाराची रणनीती व उमेदवारी ठरविण्याचा कालावधी या विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. काँग्रेसने हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या १०० दिवस आधीच उमेदवारांची घोषणा केली होती.

भाजपने मात्र अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहिली होती. याचा फटका या राज्यांमध्ये भाजपला बसल्याचे निवडणुकीनंतर घेतलेल्या आढाव्यातून स्पष्ट झाले आहे. यामुळे या राज्यांमध्ये निवडणुकीची प्रचार यंत्रणा लवकर मैदानात उतरविण्यावर चर्चा झाली.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही

राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता नाही. कर्नाटकमध्ये विद्यमान मुख्यमंत्री असताना बी. एस. बोम्मई यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून समोर केला नव्हता. या वेळीही या तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर करण्याची शक्यता नाही. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी प्रामुख्याने उपस्थित होते.