मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना नुकताच जामीन मिळाला आहे. मागील एक वर्षाहून अधिक काळ ते कारागृहात होते. त्यामुळे त्यांच्या भेटीला राष्ट्रवादीतील अनेक नेते जात आहेत. त्यातच आज अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मलिक यांच्या घरी जावून भेट घेतली. यावेळी भुजबळ यांनी मिश्कील टिप्पणी केली. भुजबळ म्हणाले, मलिक आमचे सहकारी आहेत. आमच्या दोघांच्या डिग्री आरएफजे म्हणजे ‘रिटर्न फॉर्म जेल’ आहे. आमचा सहकारी आजारी आहे. किडिनीचे प्रॉब्लम वाईट असतात जेलमध्ये हाताळणे कठीण आहे. आम्ही त्यांना तब्येत सांभाळण्यास सांगितल आहे.
शरद पवार यांचा फोटो वापरण्यावर भुजबळ म्हणाले की, आमची पार्टी एकच आहे. कदाचित पवार साहेब रागात बोलले असतील. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत ना? माझ्या मंत्रालयाच्या कार्यालयात त्यांचा मोठा फोटो आहे. ते आमचे नेते आहेत. आम्ही त्यांना मानतो, म्हणून प्रेमाने आम्ही त्यांचा फोटो लावला. हा काही गुन्हा आहे, असे मला वाटतं नाही, असंही भुजबळ यांनी नमूद केलं.
शरद पवार यांनी भाजप बरोबर न जाण्याचा स्पष्ट केलं. त्यावर भुजबळ म्हणाले की, त्यांची भूमिका आधीपासून तीच आहे, बाकी वावड्या मीडियात होत्या.





