चांदूर रेल्वे : जादूटोण्याद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाची हत्या झाल्याची घटना अमरावतीमधून समोर आली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवनी शिवारातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आजच्या आधुनिक जगातही लोक अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं धक्कादायक वास्तव यातून पुन्हा समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पाच आरोपी नागपुरवरून ताब्यात घेण्यात आले आहेत.
पैशाचा मोह नडला, अन् मांत्रिकाचाच काटा काढला!
जादुटोण्याद्वारे पैश्यांचा पाऊस पाडण्याचा प्रलोभनात झालेल्या फसवणुकीच्या आकसापोटी एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवनी शेतशिवारात ही घटना उघडकीस आली आहे. एक झोपडीत मृतहदेह आढळल्याने तपासअंती पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपासचक्रे फिरवीत पाच आरोपींना नागपुरवरून अटक केली आहे.
पैश्यांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून फसवणूक
मृतकाने आरोपींना पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं आणि तो त्यांच्याकडून पैसे उकळत होता. मात्र, मृतकाने आरोपीकडून पैसे घेऊन बतावणी केल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडला नाही आणि टाळाटाळ करत राहीला. यामुळे आरोपी आणि मृतक यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीनी मयताच्या डोक्यावर फावड्याच्या दांड्याने आणि काठीने मारून त्याची हत्या केली आणि घटनस्थाळावरून पसार झाले होते.





