पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसुन येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगची दहशत होती, त्यानंतर आता टोळक्याने तलवार आणि कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. अशातच पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मंगला टॉकीजसमोर तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
ही घटना मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तरुण चित्रपट पाहून बाहेर येताच टोळक्याने तलवार आणि कोयत्याने तरुणावर हल्ला केला व दगडाने ठेचून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नितीन मोहन म्हस्के (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नितीन म्हस्के हा मंगळवारी रात्री शिवाजीनगर परिसरातील मंगला टॉकीज या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पूर्व वैमनस्याच्या वादातून एका टोळक्याने त्याच्यावर कोयते, तलवार आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. मृत नितीन म्हस्केवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच वादातून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.





