सावंतवाडी : आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते विशाल परब उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ, फादर रॉबी, शिक्षक -पालक संघाचे सदस्य प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते.

युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मिलाग्रीस प्रशालेला इतिहास आहे. या शाळेची शिस्त आणि येथील गुणवत्ता ही नेहमीच अग्रेसर राहिली आहे. विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना आपल्या आई वडिलांचे कष्ट, शहिदांचा त्याग लक्षात ठेवावा. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा आनंद मिळेल. युवकांनी स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेत शहिदांचे बलिदान ध्यानात असू द्यावे, असेही श्री. परब यांनी सांगितले.

दरम्यान यावेळी शाळेसाठी त्यांनी तब्बल 1 लाख 11 हजार 111रुपयांची देणगी दिली.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ यांनी करून दिला.
प्रास्ताविक प्रशालेचे शिक्षक श्री. जोशी सर यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित गीते सादर केली.
या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





