आंबोली येथील ‘बाहुबली’ धबधब्याचे उद्या उद्घाटन ; पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शिक्षणमंत्री केसरकर यांचीही लाभणार उपस्थिती..!

95

सावंतवाडी : तालुक्यातील आंबोली येथील ‘बाहुबली’ धबधब्याचे उदघाटन उद्या रोजी पर्यटन मंत्री गिरीश
महाजन यांच्याहस्ते होणार आहे. आंबोली पर्यटन वाढावे यासाठी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने हा धबधबा आता सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे. ही गोष्ट पर्यटकांसोबतच स्थानिक व्यापाऱ्यांसाठी महत्वपूर्ण असल्याने, या
वर्गाकडून मंत्री केसरकरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना देऊन सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने गतीने प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी एप्रिल महिन्यामध्ये विविध शासकीय अधिकाऱ्यांसह सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याचे हवाई सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, संचलक डॉ. बी. एन. पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक जोशी मॅडम आदींचा समावेश होता. त्या सर्वेक्षणातून आंबोलीमधील या विविध पर्यटन प्रकल्पांची मांडणी करून त्याबाबत पाठपुरावा केला होता. त्याचेच फलित म्हणून या नवीन धबधब्याचे उद्घाटन आणि वर्षा महोत्सवाचे आयोजन होत आहे.

मंत्री केसरकर यांनी प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांच्या माध्यमातून या पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे. पर्यटकांशी कसे वागावे, स्वच्छता कशी ठेवावी, वेगवेगळ्या प्रकारे पर्यटकांना कसे आकर्षित करावे यासंदर्भात हे प्रशिक्षण होते. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या विकासासंदर्भात ना. केसरकर यांचे विशेष प्रयत्न आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान ‘आंबोली वर्षा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे पर्यटन मंत्री यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नारायण राणे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याचे उद्घाटन होणार आहे. नाईट सफारी, हिरण्यकेशी ट्रेकिंग, जलक्रीडा, रॅपेलिंग अशा विविध प्रकारांचा पर्यटकांना घेता येणार आहे.