धक्कादायक..! ९ विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याने तरुण शिक्षकाची शाळेतच आत्महत्या ; विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करून घेतल्याचे प्रायश्चित्त..!

940

पुणे : अभ्यास करायचा सोडून विद्यार्थी शाळेची सफाई करत असल्याचे पाहून पालकांनी ९ विद्यार्थ्यांचे प्रवेश काढून घेतले. या घटनेने नैराश्य आल्याने एका शिक्षकाने जिल्हा परिषदेच्या शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी परिसरातील होलेवस्ती येथे घडली. अरविंद ज्ञानेश्वर देवकर (वय ४६) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

दरम्यान, हा प्रकार बुधवारी घडला असला तरी गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. अरविंद देवकर हे ३० मे २०२३ रोजी होलेवस्ती येथील जि.प.च्या शाळेत रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी शाळेतील दहा मुलांशी बोलणे करून सुरुवातीला अस्वच्छ शाळा स्वच्छ करू, असे सांगत साफसफाई सुरू केली. मात्र, विद्यार्थी अभ्यास सोडून शाळा स्वच्छ करत असल्याचे सांगत नऊ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेतील प्रवेश काढून दुसऱ्या शाळेत मुलांना प्रवेश दिला. निराश झालेल्या देवकर यांनी मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश न आल्याने त्यांनी नैराश्यातून शाळेच्या वर्गातच विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

माफी मागूनही पालक नाराज…मीच जबाबदार…!
देवकर यांनी चिठ्ठीत म्हटले की, मी आत्तापर्यंत १९ वर्षे चार महिने शिक्षक म्हणून नोकरी केली. खुपटेवस्तीतील जि.प.शाळेत १२ वर्षे, मिरवडी येथील शाळेत सहा वर्षे, तर होलेवस्तीतील शाळेत २ महिने नोकरी केली. खुपटेवस्ती आणि मिरवडी येथील शाळेत माझी सेवा चांगली झाली. कारण चांगले सहकारी शिक्षक मला लाभले. परंतु होले वस्ती या ठिकाणी एकशिक्षकी शाळा असल्याने सुरुवातीला कामाच्या गोंधळात मी बावरून गेलो. मला पाहिजे त्या पद्धतीने पालकांची मने जिंकता आली नाहीत. जून महिन्यात सुरुवातीचे १३ दिवस मी विद्यार्थ्यांना अध्यापन क शकलो नाही. कारण शाळा मैदान, साफसफाई, लिखाणकाम, विद्यार्थ्यांची ओळख, गप्पा, गाणी, गोष्टी यात वेळ गेला. त्यातच मी विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेण्याची गोष्ट पालकांना खटकली. त्यातच शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घेतल्यावर कणकण जाणवल्याने जेवणाच्या सुट्टीत २० मिनिटे गोळी खाऊन अराम केला. त्यात एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. या माझ्या चुकांमुळे पालकवर्ग नाराज होऊन शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत टाकले. त्यामुळे केवळ एकच पहिलीतील विद्यार्थी राहिला. या घटनेनंतर मी पालकांची माफी मागून विनंती करूनही केवळ एकच संधी द्या, अशी विनवणी केली. परंतु मला कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अपराधीपणाची भावना माझ्या मनात खोलवर रुजली. याला केवळ मीच जबाबदार असून सहनशीलता संपून समाजाला माझ्याकडून नुकसान झाल्याने याच पवित्र मंदिरात मी माझ्या देहाचा त्याग करत अाहे. यास सर्वस्वी मीच जबाबदार असून कुणासही जबाबदार धरू नये