वारस हक्काची नोकरी डावलली ; स्वातंत्र्यदिनी उपोषण..!

101

सावंतवाडी :  सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना वारस हक्काने मिळणारी नोकरी जिल्हा रूग्णालयाच्या प्रशासनाने डावलल्याने व अर्ज विनंत्या करूनही वेळकाढूपणाचे धोरण स्विकारल्याच्या निषेधार्थ शेर्ले सिद्धार्थनगर येथील उमेश आपा जाधव या तरूणाने स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार श्री. उमेश जाधव यांचे वडील कै. आपा कृष्णा जाधव हे जिल्हा रूग्णालयाच्या सेवेत सफाईगार कर्मचारी म्हणून सेवेत होते. ते विहीत वयोमानानुसार 31/5/2011 रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त होताना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार त्यांच्या मुलांना वारस हक्काने नेाकरी दिली जाते. याचे पत्र प्रशासनाने त्यांना देणे आवश्यक होते.
मात्र त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर उमेश जाधव यांनी कार्यालयाकडे अर्ज सादर केला. मात्र सदरचा अर्ज मुदतीत नसल्याचे कारण सांगून अर्ज नाकारण्यात आला होता.
शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत आपणाला मुदत लागू होत नाही ही बाब त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर, जिल्हा रूग्णालयाने वेळकाढू धोरण स्विकारल्यानंतर 1 मे 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण केले होते.
त्यावेळी पुन्हा लेखी आश्वासन देऊन त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते व त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शनही मागविण्यात आले होते. मात्र वर्ष दीड वर्ष होवूनही त्या कार्यालयाने दखल न घेतल्याने नाईलाजास्तव येत्या स्वातंत्र्य दिनी उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून उपोषणाची नोटीस मा. जिल्हा शल्यचिकित्सक, मा. जिल्हाधिकारी इत्यादींना दिली आहे.