GOOD NEWS – भोसले फार्मसी कॉलेजात यंदापासून एम. फार्मसी. अभ्यासक्रम सुरू ; लाभ घेण्याचे आवाहन..!

92

सावंतवाडी : ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते..!’ अर्थात ज्ञानासारखे या जगात पवित्र इतर काहीही नाही. असाच ज्ञानाचा वसा संपूर्ण कोकण वासियांसाठी उपलब्ध करवून दिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी स्थित जिल्ह्यातील सर्व प्रथम स्थापित तसेच मुंबई विद्यापिठ संलग्नित एकमेव असणाऱ्या यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून औषधनिर्माणशास्त्र या क्षेत्रात पुढील शिक्षणाची संधी असणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाची म्हणजेच एम. फार्मसी (फार्मासुटिकल केमिस्ट्री) ची सुरवात करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची शिकवण घेताना रासायनिक संशोधनाची आवड निर्माण झाली आहे आणि आर्थिक तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करता ज्या विद्यार्थ्यांना आपले निवासी क्षेत्र सोडून मुंबई पुणे या सारख्या मोठ्या शहरात राहणे शक्य नाही अशा विद्याथ्र्यांसाठी हि एक सुवर्ण संधी मानली जात आहे.

एम. फार्मसी (फार्मासुटिकल केमिस्ट्री) हा औषधनिर्माणशास्त्रातील पदवीत्तर पदवी अभ्यासक्रम असून भविष्यातील संशोधन जगतातील संधी ओळखून पदवीत्तर पदवीमध्ये या नवीन अभ्यासक्रमाचे दालन भावी शास्त्रज्ञांसाठी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे उपलब्ध करून दिले आहे. सदर अभ्यासक्रम हा दोन वर्षे कालावधीचा असून तो चार सत्रात विभागला गेला आहे. यापैकी प्रथम व द्वितीय सत्रात विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्रातील नाविन्यपूर्ण व अतिमहत्वाच्या विषयांसदर्भात ज्ञानार्जन करतात तसेच तृतीय आणि चतुर्थ सत्रात संशोधनपर प्रात्यक्षिकांसह समाजोपयोगी नानाविध औषधे, औषधउपचार पद्धती, नव-नवीन संयुगे शोध यावर भर असतो. सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्रता, औषधनिर्माणशास्त्रातील पदवी १५ % गुण (एस.सी. आणि एस. टी. साठी ५०%) आवश्यक असून ए.आय.सी.टी. मार्फत घेण्यात येणारी G.PAT ही परीक्षा देणे बंधनकारक आहे.

 

एम. फार्म नंतर फार्मसीमध्ये विद्याथ्र्यांसाठी अनेक संधी उपलब्ध असतात. ते पीएच.डी. सारख्या उच्च अभ्यासासाठी जाऊ शकतात. हि पदवी प्राप्त केल्यानंतर औषध आणि तंत्रज्ञानाच्या उत्पादनाशी संबंधित क्षेत्रे जसे औषध सयुगे रचना, संशोधन, उत्पादन व औषध नियामक बाबीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित फार्मा कंपन्यामध्ये काम करण्याचीसंधी मिळेल. शेजारील गोवा राज्यातच पुष्कळ प्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फार्मा कंपन्या असल्याने रोजगाराच्या संधी ह्या द्विगुणित झाल्या आहेत. एम. फार्म पदवीधरांना ते इच्छुक असल्यास उच्च शिक्षण घेण्यास सक्षम असतील तर विविध पैलूंवर संशोधन आणि अभ्यास करून फार्मसी किंवा फार्मसी स्पेशलायझेशन मध्ये डॉक्टरेट डिग्री (पीएचडी) केल्यानंतर विविध औषधी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये उच्च पद मिळवता येईल.

 

या अभ्यासक्रमाच्या परिपूर्णतेसाठी महाविद्यालयात सुसज्य प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात आली असून उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक डॉ. गौरव नाईक यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. डॉ. नाईक हे आय. आय. टी., बी.एच. यू. येथून डॉक्टरेट आहेत. महाविद्यालयास सर्व शिखर संस्था जसे पी.सी. आय. आणि युनिवर्सिटी ऑफ मुंबई तसेच डी. टी. ई. मुंबई यांची मान्यता प्राप्त झाली आहे. या अगोदर जिल्हयातील पहिल्याच आणि मुंबई विद्यापिठ संलग्नित एकमेव एम. फार्मसी (फार्मासुटिक्स) साठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंतसले आणि इतर पदाधिकारी यांनी नवीन एम. फार्मसी (फार्मासुटिकल केमिस्ट्री) या अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सदर अभ्यासक्रमाच्या सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास भेट देण्याचे आवाहन विभाग प्रमुख प्रा. रश्मी महाबळ आणि प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी केले आहे.