- सावंतवाडी : डॉ.रुपेश पाटकर यांनी ‘संस्कार संचित’ मधून गीतेच्या तत्वज्ञानावर आधारित ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या अंतःकरणाला भिडणार्या आहेत. यातील एकेका गोष्टीचे पारायण करायला हवे, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांनी काढले.
मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्या ‘संस्कार संचित’ या पुस्तकाचे प्रकाशन गोवा-दिवाडी येथे अजित कडकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आडाळी सरपंच पराग गावकर, पत्रकार राजेश मोंडकर, भगवान शेलटे उपस्थित होते.
संस्कार संचित हे गीतेच्या अठरा अध्यायावर आधारित गोष्टीरूप पुस्तक आहे. या पुस्तकाला डॉ. भा. वा. आठवले यांची प्रस्तावना आहे.
अजित कडकडे म्हणाले, या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट बोधपर असून मी त्या सलग वाचत गेलो. यातील प्रत्येक गोष्ट अंतःकरणाला भावली. यात सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीनुसार आपण आचरण केले तर परिवर्तन घडेल. पण कादंबरीसारखे वाचन न करता, एकेक गोष्ट पुन्हा वाचायची. तिचे पारायण करायचे. गीतेच्या तत्वज्ञानावर आधारित ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अंतःकरणात रुजल्या पाहिजेत. हे पुस्तक छोटे असले तरी आशय मोठा आहे. मराठी साहित्यातील हा खूप मोठा ठेवा असून तो इतरांनाही दिला पाहिजे.





