मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाले आहेत. उद्या आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळं आता उद्या ते कुठला कथित घोटाळा बाहेर काढतात ते पहावं लागेल.
सोमय्यांनी काय केलंय ट्विट?
किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “उद्या मी उद्धव ठाकरे सेनेचा आणखी एक बीएमसी कोविड सेंटर घोटाळा उघड करेन” त्यांच्या या ट्विटनंतर आता उद्या ते नेमका काय घोटाळा समोर आणतात याकडं सर्वांच्या नजरा आहेत.
एसआयटीची स्थापना
दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेच्या कथित १२,००० कोटींच्या घोटाळा प्रकरणावर कॅगनं ठपका ठेवला होता. त्यानंतर या घोटाळ्याच्या तपासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी SITची स्थापनेचे निर्देश दिले होते. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे या एसआयटीचं नेतृत्व करणार आहेत. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर विभागातील पोलीस अधिकाऱ्यांचाही या एसआयटीत समावेश आहे. ज्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांचा असतील.





