काँग्रेसमध्येच फूट!, बड्या नेत्याची पक्षविरोधी भूमिका ; दिल्ली सेवा विधेयक प्रकरण.

79

नवी दिल्ली :  काँग्रेस नेते आणि दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या अध्यादेश विधेयकाला (दिल्ली सेवा विधेयक) पाठिंबा देत आपल्या पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच दिल्ली सेवा विधेयकाला विरोध करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये दिल्ली सेवा विधेयकावरून फूट पडल्याचं चित्र आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक -२०२३ सादर करणार आहेत. हे विधेयक यापूर्वीच लोकसभेत मंजूर झाले आहे. राज्यसभेतही ते मंजूर होण्याची शक्यता आहे.

लोकसभेत सरकारचे बहुमत असल्याने हे विधेयक मंजूर होणार हे निश्चित होते. राज्यसभेत हे विधेयक मांडले की येथे सरकारकडे बहुमत नसले तरी लोकसभेप्रमाणेच अन्य काही पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्यास ते संमत होईल… माझ्या मते या विधेयकाला विरोध करणे चुकीचे असल्याचं दीक्षित यांनी नमूद केलं.

यापूर्वी ३ ऑगस्ट रोजी एन.एन.डी.आय.ए आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर हे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले होते. मात्र राज्यसभेत अरविंद केजरीवाल या विधेयकाविरोधात विरोधी पक्षांचा पाठिंबा मागत आहेत.

केजरीवाल यांच्यावर टीका करताना संदीप दीक्षित म्हणाले की, ‘आम आदमी पक्ष कोणत्याही पक्षावर हल्ला करणारा कोण आहे?, ते स्वत: फसलेले आहेत. आपल्या पक्षाचे बडे नेते तुरुंगातून बाहेर येतील की तुरुंगात, हेही त्यांना ठाऊक नाही. त्यांनी स्वत:ची काळजी करायला हवी. काँग्रेस पक्ष केवळ या विधेयकासाठी त्यांच्यासोबत आहे.