त्रिंबकच्या अवलियाने बनवला भलामोठा नगारा…!

मालवण : तालुक्यातील त्रिंबक येथील सुप्रसिद्ध पखवाज मेकर सुभाष भाट यांनी स्वतःच्या कल्पनेतून तयार केलेला सुमारे साडे तीन फूट व्यासाचा नगारा परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा योग साधून गगनगिरी मठ येथे महाराजांच्या चरणी भेट दिला आहे. १९ जानेवारी रोजी गगनगिरी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने गगनगडावर काकड आरतीच्या वेळी हा नगारा धडधडला असून नगाऱ्याच्या नादाने गगनगड रोज दुमदुमुन निघणार आहे.

मालवण तालुक्यातील त्रिंबक गावचे सुपुत्र सुभाष भाट हे बाळा भाट या नावाने परिचित आहेत. वेगवेगळी वाद्ये बनवण्यात त्यांचा हातखंड आहे. आपल्या सुपर कल्पनेतून ते वेगवेगळी वाद्ये बनवतात. भाट हे गगनगड येथे मठात गेले होते. त्यानंतर मठासाठी मोठा नगारा भेट देण्याचा त्यांनी निश्चय केला. गावी आल्यानंतर कामाला लागत लागलीच वेल्डिंग वाल्याना गाठत आवश्यक आकारामध्ये धातूच्या जाड़ पत्र्याचा नगाऱ्याचा बेस बनवून घेतला.

सुमारे साडेतीन फूट रुंद व अडीज फूट उंचीचा नगारा चामड्याच्या बनविण्यात आला आहे. गगनगड येथे आरती चालू होण्यापूर्वी भक्तांना हा नगारा वाजवून सूचित केले जाणार आहे. बुधवारी बाळा भाट यांनी सदर नगारा गगनगिरी ट्रस्ट कडे सुपूर्द केला. नगारा भेट दिल्याबद्दल देवस्थान कडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. एक आगळंवेगळं चर्मवाद्य गुरू चरणी समर्पित केल्याबद्दल भाट यांचे कौतुक होत आहे.