सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील नगरपरिषद हद्दीमध्ये कोलगाव येथे राजरत्न पार्क नामक सोसायटी बांधत असुन त्यामध्ये फ्लॅट विकत देते असे सांगून त्याप्रमाणे ९,१५,२५२/- एवढे पैसे घेऊन तसे साठेखत केले. परंतु इमारतीचे बांधकाम पुर्ण करुन देखील ९ वर्षानंतर सुद्धा फ्लॅटचा ताबा दिलेल्या नसल्याच्या कारणातून आरोपी सौ. स्मिता शिरीष जैन (बिल्डर) यांना फसवणुक केल्याप्रकरणी सावंतवाडी न्यायालयाने समन्स बजावलेले आहे. याप्रकरणी अॅड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावंतवाडी शहरातील कोलगाव न्यू हद्द येथे राजरत्न पार्क नामक सोसायटीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित बिल्डर हिने या इमारतीचे फ्लॅट विकण्यासंदर्भात जाहिरात केलेली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी संबधित इमारतीमध्ये रक्कम रुपये १५,७६,२६०/- एवढ्या किमतीचा फ्लॅट बुक केलेला होता. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी आरोपी सौ. स्मिता जैन यांना दि. १७/०९/२०१४ ते दि. २५/०६/२०१५ या कालावधीमध्ये टप्प्याटप्याने एकूण ९,१५,२५२/- एवढी रक्कम पोहोच केलेली होती. त्यानुसार आरोपी हिने संबंधित फ्लॅटचे साठेखत देखील पुर्ण केलेले होते. परंतु इमारतीचे बांधकाम पुर्ण होऊन देखील आरोपी हि फिर्यादी यांना फ्लॅटचा ताबा देत नव्हती. या प्रकरणी फिर्यादी यांनी आरोपी हिला वारंवार विचारणा केली असता आरोपी हिने पैसे घेऊन देखील फ्लॅटचे खरेदीखत करून त्याचा ताबा देण्यास साफ नकार दिलेला होता. फिर्यादी यांची फसवणुक झाल्यामुळे फिर्यादी रामकृष्ण सावळाराम चव्हाण यांनी संबंधित बिल्डर जैन यांच्याविरोधात सावंतवाडी पोलिस स्टेशन येथे तक्रार देखील नोंदविलेली होती. परंतु त्याचा कोणत्याही प्रकारे पाठपुरावा झाला नाही. याप्रकरणी या इमारतीमध्ये अन्य १४ लोकांनी देखील फ्लॅट घेण्याकरीता आरोपी हिला पैसे दिलेले होते. त्यांची देखील आरोपी सौ. जैन यांनी फसवणुक केलेली आहे. मात्र त्यापैकी रामकृष्ण सावळाराम चव्हाण यांनी दाद मागण्याकरीता आरोपी हिच्याविरुद्ध सावंतवाडी न्यायालयात भा. दं. वि. कलम ४०६ व ४२० तसेच महाराष्ट्र ऑनरशीप ऑफ फ्लॅट अधिनियम १९४३ चे कलम १३ अन्वये अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर यांच्यामार्फत तक्रार दाखल केलेली होती. त्यानुसार सावंतवाडी न्यायालयाने अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सदरची तक्रार मंजुर करून आरोपी हिला हजर राहण्याबाबत समन्स बजावलेले आहे. याप्रकरणी अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर अँड. अशोक गंगाराम जाधव, अॅड. गणेश प्रकाश चव्हाण व चैतन्य सावंत यांनी काम पाहिले.





