सावंतवाडी : वायरमन देण्यास वेळकाढू भूमिका घेणाऱ्या सावंतवाडी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यां विरोधात संतप्त झालेल्या माडखोल ग्रामस्थांनी तिरडी घेवून कार्यालयासमोर आगळे-वेगळे आंदोलन केले. यावेळी चक्क फटाके आणि ढोल वाजवून अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला. ग्रामस्थांचा हा रुद्रावतार पाहून उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांनी कायमस्वरुपी वायरमन देत असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांना दिले. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांतून जल्लोष करण्यात आला. सरपंच शृष्णवी राऊळ, उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याला शिवसेना आणि राष्ट्रवादीकडुन पाठींबा देण्यात आला.
माडखोल येथे वायरमन देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात आली होती. आठवड्यापुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे गावात वीज नसल्याने अनेकांना त्याचा फटका सहन करावा लागला होता. दरम्यान वायरमन न दिल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांकडुन कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. दरम्यान आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. दरम्यान आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज तिरडी घेवून या ठिकाणी धाव घेतली. विशेष म्हणजे कार्यालयासमोर तिरडी ठेवून ढोल व फटाके वाजवून अधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या आंदोलनाला ठाकरे सेनेचे नेते बाळा गावडे, मायकल डिसोझा, आबा सावंत यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान आदींनी पाठींबा दर्शविला. यावेळी सर्वांनी मिळून उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांच्याशी चर्चा केली. जो पर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान आपण गावाला कायमस्वरुपी वायरमन देत असल्याचे सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली तसेच कंत्राटी पध्दतीवर काम करीत असलेल्या दोन्ही वायरमनची बदली करण्यात येवू नये, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नारायण राऊळ, राजकुमार राऊळ, यशवंत गावडे, विशाल राऊळ, विलास राऊळ, स्वप्नील लातये, अविनाश राऊळ, संतोष राऊळ, आनंद राऊळ, पांडुरंग राऊळ, संतोष राणे, सूर्यकांत राऊळ, अशोक लातये, विठ्ठल राऊळ, नामदेव राऊळ, भगवान राणे, हरिश लातये, विशाल राऊळ, संतोष लातये, रमेश राऊळ, अनिकेत राऊळ, संजय राऊळ, भगवान तेली आदी उपस्थित होते.





