दंगलखोरांनी कार पेटवली; महिला न्यायाधीश आणि तीन वर्षाच्या लेकीचा सुटकेचा थरार!

100

नवी दिल्ली : हरियाणा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराऱ्या पार्श्वभूमीवर एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. नूह जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कारला काही समाजकंटकांकडून आग लावण्यात आली. न्यायाधिशांनी कसेबसे पळून जाऊन आपला जीव वाचवला. धक्कादायक म्हणजे यावेळी त्यांची तीन वर्षाची मुलगीही त्यांच्यासोबत होती. पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमधून ही माहिती उघड झाली आहे.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंजली जैन आणि त्यांची तीन वर्षाची मुलगी यांना आपला जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली, तसेच हवेत गोळीबार केला असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर जमावाने त्यांच्या कारला आग लावली. नूह पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

न्या. अंजली जैन, त्यांची लहान मुलगी आणि त्यांच्या स्टाफला जुन्या बसस्टँडमध्ये असलेल्या वर्कशॉपमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर काही वकीलांच्या मदतीने त्यांना तेथून बाहेर पडता आले. तेक चंद यांच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, दुपारी एक वाजता अंजली जैन, त्यांची मुलगी आणि स्टाफ कर्मचारी सियाराम हे वॉल्क्सवेगन कारमधून एसकेएम मेडिकल कॉलेजमध्ये औषधी खरेदी करण्यासाठी गेले होते. परत येत असताना जवळपास दोनच्या सुमारास १०० ते १५० लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.