मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यात शरद पवार प्रमुख पाहुणे होते. पवारांनी या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावल्यामुळे इंडिया आघाडीतील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार या नेत्यांची नाराजी दूर करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
५ ऑगस्टला मुंबईत नेहरु सेंटर इथं सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीत विरोधकांची आघाडी INDIA आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदा महाविकास आघाडीची बैठक होत आहे. शरद पवार यांनी स्वत: ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सभा आणि प्रचार कसा असेल, याबाबत बैठकीत नियोजन होणार असल्याची चर्चा आहेत. तसेच उद्या सायंकाळी ७ वाजता शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वतीनं गरवारे क्लब इथं मविआच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तर बुधवार दिनांक ३ ॲागस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावतीने ताज हॅाटेल, कुलाबा इथं मविआ आमदारांसाठी स्नेहभोज आयोजित करण्यात आले आहे.





