…अन्यथा आजगावला रास्तारोको आंदोलन!; धाकोरा सरपंचांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सावंतवाडी आगार प्रमुखांना इशारा..!

311

सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरा, फणसखोल वसवाचे तळे आदी ग्रामस्थांनी आज सावंतवाडी आगार प्रमुख विशाल शेवाळे यांची भेट घेत निवेदन सादर करून सकाळची साडेसहा वाजता एसटी बस फेरी सुरू करण्याबाबत निवेदन दिले.

आपल्या निवेदनात ते म्हणतात की, सकाळी साडेसहा वाजता फणसखोल ही एसटी बस सुरू करावी, सदर बस ही मागील ४० वर्षांपासून अविरत सुरू होती. या बसमुळे गरीब व होतकरू मुलांचे शिक्षण पूर्ण झाले. आज कोविडनंतर ती बस बंद केल्याने ती एसटी बस शिरोडा येथे मुक्कामाला असते. त्यामुळे शिरोडा येथून सावंतवाडी, गोवा जाणाऱ्या मुलांचे अतोनात हाल होतात. महाराष्ट्र शासन हे नेहमी गरीब, होतकरू मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू इच्छित नाही. तरी ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिरोड्याला थांबणारी फणसखोल ही एसटी बस सकाळी साडेसहा वाजता सोडण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या ७ ऑगस्ट रोजी आजगाव येथे रास्तारोको आंदोलन केले जाईल असा सज्जड इशाराही धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, उपसरपंच रामचंद्र गवस तसेच यावेळी उपस्थित असलेले तीनही गावचे ग्रामस्थ, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.