आत्मघाती स्फोटात पाकमध्ये ४० जण ठार; खैबर पख्तुन्ख्वामध्ये सभेवर हल्ला!

134

पेशावर : पाकिस्तानमधील खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात आज एका राजकीय सभेत झालेल्या आत्मघाती बाँबस्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला, तर १५० हून अधिक लोक जखमी झाले. अफगाणिस्तानला लागून असलेल्या खार या आदिवासीबहुल जिल्ह्यात ही घटना घडली. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जमैत उलेमा ए इस्लाम फझल (जेयूआय-एफ) या कट्टर इस्लामवादी पक्षाने कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या सभेत संध्याकाळी चार वाजता हा हल्ला झाला. या वेळी पाचशेहून अधिक कार्यकर्ते हजर होते. सभा सुरू असतानाच हल्लेखोराने स्वतःच्या शरीरावरील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला.

हा स्फोट शक्तिशाली असल्याने त्यात ४० जणांचा मृत्यू झाला, तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये ‘जेयूआय-एफ’च्या स्थानिक नेत्याचाही समावेश आहे. या बाँबस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. ‘हा हल्ला म्हणजे जिहाद नसून दहशतवाद आहे.

हा मानवतेवरील हल्ला असून त्याची चौकशी होणे आवश्‍यक आहे,’ अशी मागणी ‘जेयूआय-एफ’चे नेते हाफिज हमदुल्ला यांनी केली. या आधीही आमच्या पक्षाला लक्ष्य केले गेले असले तरी कारवाई मात्र झालेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

या हल्ल्याच्या चौकशीमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि काळजीवाहू मुख्यमंत्री आझम खान यांनी स्वत: लक्ष घालावे, असे आवाहन ‘जेयूआय-एफ’चे प्रमुख मौलाना फझलउर रेहमान यांनी केले आहे. तसेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जखमींना दाखल केलेल्या रुग्णालयांमध्ये जाऊन रक्तदान करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

अफगाणिस्तानमध्ये २०२१ मध्ये तालिबानकडे सत्तेची सूत्रे गेल्यापासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांची संख्या वाढली आहे. पाकस्थित तेहरीके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनेही पाकिस्तान सरकारबरोबरील शस्त्रसंधी करार मोडून हल्ले करण्याचे सत्र सुरु केले आहे. यावर्षी ३० जानेवारीला पेशावरमधील एका मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १०१ जणांचा मृत्यू झाला होता.