१ ऑगस्टपासून मासेमारी हंगामास सुरुवात..!

113

मालवण : पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात लागू असलेला दोन महिन्यांचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी उद्या सोमवार ३१ जुलै रोजी संपत आहे. मंगळवार १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर किनाऱ्यांवर मच्छीमारांची लगबग सुरू वाढली असून, मच्छिमार नव्या उत्साहात दर्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान, समुद्री वातावरण व वारे पाऊस यांचा अंदाज घेऊन नारळी पौर्णिमा उत्सवाला दर्याला श्रीफळ अर्पण अनेक मच्छिमार तेव्हा मासेमारीला सुरवात करतात अशीही प्रथा आहे. मात्र शासकीय नियमानुसार १ ऑगस्ट पासून मासेमारी हंगामा सुरवात होणार आहे.

पारंपरिक मच्छीमार बांधव व संघटनांनी शासनाकडे किनारपट्टीवर एकाचवेळी मासेमारी बंदी असावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार देशाच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर एकाचवेळी १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा सुधारीत बंदी कालावधी मागील काही वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला.

मुंबई, अलिबाग, डहाणू, वसई, उरण, नाव्हा शेवा, हर्णे, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ले यांसारख्या राज्याच्या किनारपट्टीवरील लहान मोठ्या ५० बंदरात मासेमारीची उलाढाल असते.