श्रीहरीकोटा : भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. सिंगापूरच्या ‘डीएस-एसएआर’ या उपग्रहासह अन्य सहा उपग्रहांना इस्रोच्या PSLV-C56 रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले. आज सकाळी सहा वाजता पीएसएलव्हीने उड्डाण घेतलं. यानंतर अवघ्या 25 मिनिटांमध्ये सर्व उपग्रहांना त्यांच्या कक्षेत पोहोचवण्यात आलं.
श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या पहिल्या लाँच पॅडवरुन हे प्रक्षेपण पार पडलं. ही एक पूर्णपणे व्यावसायिक मोहीम आहे. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड ही या मोहिमेचे संचालन करत आहे. ही संस्था अवकाश मंत्रालयाच्या अंतर्गत येते.
डीएस-एसएआर या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा उपग्रह हा सिंगापूरचा ‘DS-SAR’ हा आहे. सिंगापूर सरकारच्या डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सी आणि सिंगापूरमधील एसटी इंजिनिअरिंग यांनी संयुक्तपणे हा उपग्रह विकसित केला आहे. सिंगापूर सरकारमधील संस्थांना आणि ST इंजिनिअरिंग कंपनीला व्यावसायिक वापरासाठी हा उपग्रह फायद्याचा ठरणार आहे.





