सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे घर असलेल्या, सावंतवाडी मतदारसंघात शिक्षणाचे बारा वाजले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील तब्बल २२ शाळांना अद्यापपर्यंत पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे शिवसेनेने सामाजिक बांधिलकी म्हणून त्या मुलांना आज पुस्तके दिली. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे फक्त गजाली सांगणारे केसरकर आपल्याच मतदारसंघात उघडे पडले, असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. दरम्यान दुसरीकडे मतदारसंघातील आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा आहे. त्या ठिकाणी सुद्धा केसरकरांचा दुर्लक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औषधे वाटप करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
श्री. राऊळ यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केसरकर यांच्यावर टीका केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, योगेश नाईक, सुनील गावडे आदी उपस्थित होते. याविषयी राऊळ म्हणाले, या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या मतदार संघात असताना तालुक्यातील तब्बल २२ शाळातील मुलांना अद्यापपर्यंत पुस्तके उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आज ख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे
औचित्य साधून आम्ही त्या मुलांना पुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे केसरकर हे आपण सर्व मुलांना मोफत पुस्तके दिली असे सांगत आहेत, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. वीस दिवसांवर परीक्षा येऊन ठेपलेली असताना मुलांकडे पुस्तकेच नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक शाळेच्या शिक्षकांनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आम्ही संबंधित मुलांना पुस्तके देण्याचा निर्णय घेतला. आज कळसुलकर शाळेत या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी त्यांनी केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्यांनी आजपर्यंत मतदारसंघातील लोकांना केवळ गजाली सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही सेवा दिलेले नाही. तालुक्यातील आरोग्य केंद्रात आज औषध उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. हे लक्षात आल्यानंतर आम्ही औषध पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. काल निरवडे ग्रामपंचायत पासून त्याची सुरुवात करण्यात आली. आता बांदा, मळेवाड, सांगेली, आंबोली या गावांना सुद्धा औषध पुरवठा करण्यात येणार आहे. आम्ही पुस्तके दिली. मात्र त्याला आंदोलन म्हणणार नाही ही सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करत आहोत. मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे. शिक्षणाधिकारी जर केसरकरांना चुकीची माहिती देत असतील तर याबाबत त्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे. प्रशासकीय अधिकारी आता कॅबिनेट मंत्रीपद असून सुद्धा केसरकरांना ऐकत नाहीत. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असे राऊळ यांनी सांगितले.





