मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदासाठी चुरस सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकदा विविध नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकळे आहेत. काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली. मात्र ठाकरे गटाच्या समर्थकाने थेट उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख केला.
नुकताच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस झाला. दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी होते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावण्यात आले.
उद्धव ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकाच्या वतीने मातोश्री बाहेर भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे असे बॅनर लागले आहेत. बॅनरवर भारताचा नकाशा दिसून येतो. त्या नकाशामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर ‘एक संयमी नेतृत्व, भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे’, असा उल्लेख करण्यात आला आहे.





