सावंतवाडी : मागील चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास आंबोली घाट मार्गात दरड कोसळली. ही दरड रस्त्यावरून दूर करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे या कामावर जातीने लक्ष ठेवून आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दगड व माती बाजूला करण्यात येईल व नियमित प्रमाणे वाहतूक सुरू होईल, अशी माहिती त्यांनी प्रहारशी बोलताना दिली.
शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास आंबोली घाटमार्गात दरड कोसळली. कोसळलेल्या दरडीतील माती व दगड घाटमार्गावर आल्याने रात्रीपासूनच धिम्या गतीने एकेरी वाहतूक सुरू होती. त्याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला रात्री देण्यात आली होती मात्र रात्रीचा वेळ व मुसळधार पाऊस यामुळे या ठिकाणी काम करणे कठीण असल्याने शनिवारी सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने दरड दूर करण्याचे काम सुरू करण्यात आले.सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे ११ च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत उपअभियंता वैभव सगळे, शाखा अभियंता विजय चव्हाण व अन्य अधिकारी व कर्मचारीही युद्ध पातळीवर ही दरड हटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.त्यातच महिन्याचा चौथा शनिवार असल्याने व सलग दोन दिवस सुट्टी असल्याने पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात आंबोलीच्या दिशेने येऊ लागले आहेत. मात्र दरड हटविण्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण दरड हटवून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येईल, अशी माहिती सर्वगोड यांनी दिली आहे.





