सावंतवाडी : ज्याचे शिक्षण मंत्री तथा भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मतदारा संघात फिरणार, मतदारांना वेळ देणार, असे सांगून मतदारसंघातील लोकांची फसवणूक चालवली आहे. ते ढोंगी आहेत. निवडणूका आल्या की ते आश्वासने देतात. नंतर मात्र साडे चार वर्षे गायब होतात, अशी टीका आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.
सावंतवाडी तालुक्यात सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना सावंतवाडी मतदारसंघाला कोणी वाली राहिलेला नाही. मंत्रीपद असतानासुद्धा सावंतवाडी मतदारसंघ पोरका आहे. त्यामुळे आता करायचे काय.? असा सवाल करून, गजाली सांगणाऱ्या मंत्र्यांचा आम्ही निषेध करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी उन्हाळ्यात सुद्धा पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु मतदारसंघाकडे केसरकर यांचा कानाडोळा आहे ते फक्त विमानाने गोव्यात उतरतात सावंतवाडीत येतात आपण हे करणार ते करणार मतदार संघासाठी वेळ देणार, गावोगाव फिरणार असे सांगून लोकांना खोटी आश्वासने देत आहेत. मात्र आता लोकांना त्यांची नस कळली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील जनता त्यांना काही झाले तरी माफ करणार नाही.
श्री . राऊळ पुढे म्हणाले, सावंतवाडीvमतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु या ठिकाणी मंत्री असलेल्या केसरकर यांना कोणतेही सूत्र नाही, फक्त यायचे आणि वेगवेगळ्या घोषणा करायच्या, एवढेच काम त्यांच्याकडून सुरू आहे. आंबोली कबुलायत गावकर प्रश्न सुटला, अशी घोषणा केसरकर यांनी केली. मात्र प्रत्यक्षात त्यांचा सत्कार स्थानिक ग्रामस्थांनी केला नसल्यामुळे त्यांनी पुन्हा वनव्याचा प्रश्न अद्याप पर्यंत सुटलेला नाही, असे सांगून थंड दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी लोकांची दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्याला येणाऱ्या काळात जनता नक्कीच जागा दाखवेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कोलगाव येथे झालेल्या खोट्या “ॲट्रॉसिटी” गुन्ह्या संदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. खोलात जाऊन पोलिसांनी याची चौकशी करावी व त्यानंतरच पुढील भूमिका घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, आबा सावंत, राजू शेटकर, मेघश्याम काजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.





