मालवण : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी बळीराजासाठी एक दिवस देत शेतीच्या कामाचा अनुभव घेतला.
सर्वांचे अन्नदाता असलेल्या शेतकरी राजाला किती कष्ट करावे लागतात, हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ओझर विद्यामंदिर कांदळगावच्या विद्यार्थ्यांनी कांदळगावचे प्रसिद्ध शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पारकर यांच्यासाठी एक दिवस देऊन कांदळगाव येथे शेतीच्या बांधावरील शाळेचा अनुभव घेतला. या बांधावरच्या शाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शेतीच्या मळ्यामध्ये चिखलात भाताच्या रोपांची लावणी करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. मुसळधार पाऊस असतानाही न डगमगता विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शेतीचे काम केले. या बांधावरच्या शाळेमध्ये त्यांना शास्त्रीय पद्धतीने भात लावणी कशी करावी, याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. विद्यार्थ्यांना कांदळगावचे कृषी सहाय्यक सुनील कदम आणि कृषीमित्र स्वप्नील साटम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी शाळेसाठी विविध बियाणी भेट दिली. बांधावरच्या या शाळेत ओझर विद्यामंदिरचे विद्यार्थी : आर्यन कांदळगावकर, योगेश पालव, शुभम परुळेकर, प्रांजली कुंभार, उदय पाटील, ओमकार राणे, भक्ती तेली, तृप्ती परुळेकर, विघ्नेश कुंभार, अमृता बागवे, रोहित परब, अस्मी पारकर, निनाद भोगले, तुकाराम लाड, साहिल चव्हाण, संचिता परब, रिया कांदळगावकर, वीरेश डिचोलकर, अवधूत पारकर, मधुरा आयकर तसेच शिक्षक प्रविण पारकर आणि शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव हेसुद्धा सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सौ. दिपाली पारकर, सौ.रसीका पारकर वैष्णवी डिचोलकर इ. उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. ‘बांधावरची शाळा’ या उपक्रमामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना शेतीचा प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांच्या मनामध्ये शेतीबद्दल आवड निर्माण केल्यामुळे मुलांचे व शाळेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





