अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सरखेज-गांधीनगर महामार्गावर गुरुवारी पहाटे १-१.३० च्या सुमारास हा अपघात झाला. आधीच झालेला एक अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना दुसऱ्या एका भरधाव कारने चिरडल्यामुळे ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एसजी हायवेवर असणाऱ्या इस्कॉन फ्लायओव्हरवर एका ट्रक आणि थार गाडीचा अपघात झाला होता. यामध्ये थार गाडीला धडक देऊन ट्रक पसार झाला होता. या अपघातानंतर महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. मदतकार्य करण्यासाठी आणि अपघात पाहण्यासाठी कित्येक लोक याठिकाणी उतरले होते.
त्यानंतर अचानक एक भरधाव जॅग्वार कार आली, आणि थेट या गर्दीमध्ये शिरली. यामुळे कित्येक जण उडून लांब पडले. या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे १० ते १२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एका होमगार्ड जवानाचाही समावेश आहे.
वाहन चालकही जखमी-
या अपघातात जॅग्वारचा चालक तथ्य पटेल देखील जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रचंड वेगात असलेल्या जॅग्वार गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.





