अजित पवारांच्या भेटीला चक्क ठाकरे पिता-पुत्र!

241

मुंबई : अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांनी शिंदे-फडणीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर कदाचित उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अजित पवारांना भेटले.
विरोधकांचा चेहरा असलेले उद्धव ठाकरे हे थेट अजित पवारांच्या दालनात जाऊन भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांसोबत घेतलेल्या या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल खुद्द उद्धव ठाकरेंनी खुलासा केला आहे.

उद्धव ठाकरेंनी ही दिली माहिती- उद्धव ठाकरे म्हणाले की, काल आणि परवा बंगळुरु येथे देशप्रेमी पक्षांची बैठक पार पडली. जी लोकशाही प्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे. ही लढाई व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून हुकूमशाही विरोधात आहे. पण जो पायंडा पडतो आहे ते देशासाठी घातक आहे, त्यासाठी सर्व लोकशाहीप्रेमी पक्ष एकत्र येत आघाडी मजबूत निर्माण झाली आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
अजित पवारांशी काय चर्चा झाली?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी याबद्दल माहिती दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांने राज्यासाठी चांगले काम करावे, असे सांगितले. इथे सत्तेची साठमारी चालली आहे त्यामध्ये राज्याचे तसेच मुळ शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.