कुडाळ : सायकलिस्ट्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग (CAS) आणि कुडाळ सायकल क्लब आयोजित इन्स्पायर सिंधुदुर्ग 2023 भव्य सायकल मॅरेथॉनचे आयोजन 12 फेब्रुवारी रोजी बॅ नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ एम आय डी सी येथे करण्यात आले असून Pedal for Health… Pedal for Environment ही टॅगलाइन घेऊन इन्स्पायर सिंधुदुर्ग 2023 या सायकल मॅरेथॉनचे 25,50,100 किमी गटात आयोजन होणार असून सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटक, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, मुंबई येथून सायकलपटू सहभागी होणार आहेत.
तसेच या मॅरेथॉनचे यजमानपद भूषवण्यासाठी कुडाळ सायकल क्लब सज्ज असल्याची माहिती कुडाळ सायकल क्लब चे अध्यक्ष रुपेश तेली व सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी स्पाईस कोकण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली..यावेळी कुडाळ सायकल क्लब अध्यक्ष -रुपेश तेली ,इव्हेंट चेअरमन – शिवप्रसाद राणे ,सायकलिंग असो. सिंधुदुर्ग सचिव अमोल शिंदे,आदी उपस्थित होते.
कुडाळ सायकल क्लब स्थापन होऊन २६ जानेवारी २०२3 ला पाच वर्षे पूर्ण करीत आहे.या पाच वर्षांत सायकल क्लबने सायकल क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या सायकल क्लब चे सदस्य रुपेश तेली यांनी दोन वेळा तर शिवप्रसाद राणे व भूषण तेजम यांनी प्रत्येकी एकदा सुपर रँडोनियर हा ‘किताब मिळवला. एका वर्षात 200,300,400 व 600 किमी सायकलिंग दिलेल्या वेळेत पूर्ण करणाऱ्या सायकलिस्टला सुपर रँडोनियर हा किताब मिळतो.जिल्ह्यातून पुष्कर कशाळीकर,हरीश नार्वेकर, अभिजित वझे व नुकताच या किताबाला गवसनी घालणारा जिल्ह्यातील सर्वात तरुण SR संयम सोमण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकून 7 सुपर रँडोनियर आहेत.
गेल्या वर्षी रुपेश तेली, अमित तेंडोलकर व शिवप्रसाद राणे हे कुडाळ ते कन्याकुमारी हा 1307 किमी चा खडतर सायकल प्रवास करून आले. यावर्षी सायकलिस्ट्स असोसिएशनच्या पुढाकारमुळे सायकलिंग च्या शालेय स्पर्धा यावेळी क्रीडा खात्याच्या सहकार्याने प्रथमच आपल्या जिल्ह्यात पार पडल्या. यामधून 14,17 आणि 19 या वयोगटातून 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यामधून 12 विद्यार्थी व विद्यार्थिनी विभाग स्तरापर्यंत जाण्यात यशस्वी ठरले.पुढील वर्षी अधिक मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होऊन राज्यस्तरापर्यंत पोहचण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत.
कुडाळ सायकल क्लबने ज्या ज्या वेळी शक्य असेल तेव्हा तेव्हा सायकलिंग प्रमोट केले आहे. मग शिवजयंतीचे औचित्य असो, पोलिओ राईड असो किंवा सव्वीस जानेवारी आणि 15 ऑगस्टचे च्या राईड असोत. जिल्ह्यातील प्रत्येक सायकल क्लबच्या संडे ride असतातच आणि यामधून अनेक सायकलिस्ट घडवले जातात.प्रत्येक इव्हेंट मध्ये कुडाळ क्लबचा मोठा सहभाग राहिला आहे. सायकलिंग असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आयोजित या स्पर्धेचे यजमानपाद प्राप्त करून कुडाळ क्लबने एक गरुडझेप घेतली आहे असे म्हणावे लागेल.
इन्स्पायर सिंधुदुर्ग 2023 चे आयोजन हे मुळात आपल्या जिल्हय़ाला सायकलिंगसाठी इन्स्पायर करणे प्रोत्साहित करणे हेच आहे मागील पाच वर्षात इन्स्पायर सिंधुदुर्गचे आयोजन सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कणकवली येथे झाले असून, यंदा पुन्हा कुडाळ येथे आयोजन होतं आहे .या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जिल्ह्यातील सायकलिंगला सुगीचे दिवस येतील अशी आशा निर्माण झाली आहे.
ही स्पर्धा २५,५० व १००किलोमीटर अशी विभागलेली असेल त्यात यजमान सिंधुदुर्गासह गोवा, कर्नाटक, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, मुंबई येथील सायकलपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच मेडल्स व सर्टिफिकेट्स दिली जाणार आहेत तर सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना टीशर्ट दिली जातील.
या स्पर्धेत २५किलोमीटर गटात स्पर्धकांना कुडाळ वेंगुर्ले मठ पोलीस लाठी कुडाळ * ५०किलोमीटर गटात कुडाळ मठ वेंगुर्ले बंदर कुडाळ * तर १००किलोमीटर गटात कुडाळ वेंगुर्ला बंदर केळूस,म्हापण, चिपी, कुंभारमठ, मालवण,चौके नेरूरपार, कुडाळ MIDC असा मार्ग असेल.
या मार्गावरून सायकल सफरीने सिंधुदुर्गातील निसर्ग नव्याने गवसेल हे मात्र नक्की!!!स्पर्धेसाठी २५ किलोमीटर २ तास ५०किलोमीटर ४तास व १०० किलोमीटर ७.30तास असा वेळ निश्चित केला आहे स्पर्धेच्या मार्गावर क्लबतर्फे हायड्रेशन पॉईंट्स,सपोर्ट व्हेईकल, ऍम्ब्युलन्स सोबत तज्ज्ञ सायकलस्वार अशा सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी ठेवली आहे.स्पर्धेमध्ये जिल्हा बाहेरून येणारे स्पर्धक असतीलच पण सोबत आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकल स्वारांनी सहभागी होऊन आपला फिटनेस सिद्ध करावा व पुन्हा एकदा सायकलिंगला प्रोत्साहित करावे असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे ही स्पर्धा यादगार होण्याच्या दृष्टीने क्लबने जय्यत तयारी केली आहे.
खरंतर ही स्पर्धा म्हणजे स्वच्छ पर्यावरणाचा व उत्तम आरोग्याचा संदेश देणारी रॅली म्हटली तरी वावगे ठरणार नाही या स्पर्धेत क्रमांकांना फारसे महत्त्व नसून स्पर्धा पूर्ण करण्यावर जास्त भर देण्यात येणार आहे. ज्या स्पर्धकांना यात सहभाग घ्यायचा असेल त्यांच्यासाठी क्लबतर्फे मोबाइल क्रमांक 7030649666/ 9921959988 जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सायकलिंग -कुडाळ सायकल क्लब,रेनबो रायडर्स ओरोस,PAWS सावंतवाडी,कनक रायडर्स कणकवली, वेंगा बॉईज वेंगुर्ला,ब्युटीज ऑन व्हिल्स कट्टा,देवगड इको व्हिलर,मालवण सायकलिंग क्लब या सर्व सायकल क्लबचे जिल्ह्यातील सायकलिंग चळवळ वाढवण्यासाठी मोठे योगदान आहे.
या भव्य सायकलिंग मॅरेथॉनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटूंनी सहभागी व्हावे असे आवाहन सायकलिंग असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग अध्यक्ष -श्री गजानन कांदळगावकर ,कुडाळ सायकल क्लब अध्यक्ष श्री रुपेश तेली,
इव्हेंट चेअरमन श्री शिवप्रसाद राणे,सायकलिंग असो. सिंधुदुर्ग सचिव श्री अमोल शिंदे यांनी केले आहे. डाॅ. सिध्दार्थ परब, प्रमोद भोगटे, प्रथमेश सावंत, राजन बोभाटे अजिंक्य जामसंडेकर आदी उपस्थित होते.





