होडावडा पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प, प्रशासनाचे दुर्लक्ष..!

73

सावंतवाडी : होडावडा पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून विद्यार्थी, नोकरदारांना फटका बसला आहे. पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावरील होडावडा पूल पाण्याखाली गेले. परिणामी पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर शालेय विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचे मोठे नुकसान झाले. पुलाची उंची कमी असल्याने पुलावर पाणी येते. दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या होडावडा पुलाची उंची वाढविण्याची मागणी वारंवार होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उपस्थित वाहनचालकांनी दिल्या.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने काही ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर पाणथळ शेतीची कामे खोळंबली आहेत. मुसळधार पावसामुळे पुलावर पाणी आल्याने होडावडासह सावंतवाडी वेंगुर्ले जाणाऱ्या वाहनचालकांची मोठी कोंडी केली. पाणी कमी होईपर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागली.

दरम्यान, होडावडा सरपंच रसिका केळुसकर म्हणाल्या की, वेंगुर्ले सावंतवाडी मुख्य रस्त्यावर होडावडा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुराचे पाणी पुलावरून जाते. दमदार पावसामुळे रस्ता वाहतुकीस काही काळ बंद झाला होता. आज सकाळीच पूर आल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार, व्यवसायासाठी जाणारे तसेच रुग्ण व शेतकरी वर्गाची गैरसोय झाली. सदर पूल अनेक वर्षांपूर्वी बांधलेले असून त्या ठिकाणी पुलाची उंची वाढवून नवीन बांधकाम होणे आवश्यक असल्याची मागणी सरपंच रसिका केळुसकर यांनी केली.