राजधानी झाली जलमय ; नागरिकांच्या अडचणी वाढल्या..!

59

नवी दिल्ली : हरियाणातील हथिनी कुंडातून पाणी सोडल्याने काल सकाळपासून यमुना नदीच्या पाण्याची पातळी २०८.४६ मीटरवर गेली. त्यामुळे पुराचे पाणी दिल्लीच्या मुख्य रस्त्यावर आले.. झिराबादमध्ये मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यमुना बँक मेट्रो स्थानक यामुळे तात्पुरते बंद करण्यात आले होते. राजघाट, मयूर विहार या भागांत पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या पुरामुळे दिल्लीतील शाळा, महाविद्यालयांना रविवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

दिल्लीच्या सराय कालेखा भागात गुरुवारी सकाळी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. शास्त्री पार्क, खजुरी पुश्ता, खजुरी खास इत्यादी भागात देखील हीच परिस्थिती होती. पुरामुळे वझिराबाद, चंद्रावल तसेच ओखला पम्पिंग बंद पडल्याने काही भागात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पम्पिंगची पाहाणी केली. नदीतील पाण्याची पातळी २०८.४६ मीटरवर गेली आहे.. या पाण्याचा निचरा करण्यासाठी किमान १ ते २ दोन दिवस लागतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, हवामान खात्याने २२ जुलैपर्यंत दिल्लीसह बिहार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे काही राज्यांतील स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीत पुराच्या पार्श्वभूमीवर उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत.