आज महाराष्ट्रासाठी उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याची गरज – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर

58

महाराष्ट्र : सद्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. प्रत्येक मतदारानं पक्ष, कार्यकर्ता बघून मतदान केले होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी १०७ हुतात्मे गेले तेव्हा महाराष्ट्राला मुंबई मिळाली. आपला महाराष्ट्र हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीश्वरासमोर महाराष्ट्र कधीच झुकला नाही, वाकला नाही.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्याचा मी एक साक्षीदार आहे. त्याग, समर्पणातून शिवसेना उभी राहिली आहे. मध्यंतरी भावकीत भांडण होऊन राज-उद्धव ठाकरे विभक्त झाले. राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. महाराष्ट्रात राजकारण आणि खुर्चीसाठी शिवसेना, राष्ट्रवादीत फुट पाडली. महाराष्ट्र दुभंगला जात आहे. देशातील प्रादेशिक पक्ष फोडण्याच काम दिल्लीश्वर करत आहेत. त्याला शह देण्यासाठी महाराष्ट्राला अन देशाला वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे दोन सैनिक राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे काळाची गरज आहे. मराठी माणसांसाठी या दोन भावांनी एकत्र येत नवी दिशा दाखवावी. या मतलबी राजकारणाला जागा दाखवून द्यावी. महाराष्ट्र तोडण्याच काम करणाऱ्यांना रोखत त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसेनेचा पाया असलेल्या कोकणातून राज उद्धव यांना आवाहन करतो की हेवेदावे बाजुला ठेवून एकत्र या. शिवाजी महाराजांच हिंदवी स्वराज्य, भगवी पताका डौलाने फडकविण्यासाठी हातात हात घालून एकत्र या, दिल्लीश्वराला त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन कोकणातील शिवसेनेचे सुरुवातीचे जिल्हाप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केले आहे.