सावंतवाडी : खाकी वर्दी अर्थात पोलीस म्हटले की समाजात एक वेगळाच बघण्याचा दृष्टिकोन असतो. अनेकदा एखाद्या वाईट किंवा दुर्दैवी घटनेबद्दल संपूर्णतः जबाबदारीचे खापर पोलिसांच्या माथी मारले जाते. मात्र तत्कालीन बांदा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्य केलेले व सध्या पालघर तालुक्यातील विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर कार्य करणारे प्रदीप गीते यांच्या बद्दल व त्यांच्या कार्यशैलीबद्दल समाज मनामध्ये प्रचंड आदर व स्नेहभाव पहावयास मिळाला.
विक्रमगड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांची बदली झाली आणि त्यांचा निरोप समारंभ अनोख्या शैलीत पार पडला.
यावेळी त्यांच्या जागी आलेले प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे यांचाही स्वागत समारंभ संपन्न झाला.
विक्रमगड येथील संत रोहिदास सभागृहात पार पडलेल्या पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या निरोप समारंभ प्रसंगी अनेक समाज बांधव व नागरिक भावूक झाले होते.
प्रदीप गीते यांच्यावर अक्षरशः फुलांचा वर्षाव करत प्रदीप गीते यांना अनोख्या शैलीत भावनिक दृष्ट्या निरोप देण्यात आला.
याप्रसंगी पालघर जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





