मुंबई : गुहागरहून निघालेले ऑलिव्ह रिडले कासव हे चक्क श्रीलंकेच्या समुद्रापर्य़ंत पोहोचले आहे. शेकडो मैलांचा हा प्रवास बागेश्री नावाच्या कासवाने अवघ्या साडेचार महिन्यात पार केला आहे. सध्या श्रीलंकेच्या समुद्री हद्दीत असलेली बागेश्री गॅले या शहराकडे वळत असल्याचे दिसत आहे.
वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाने फेब्रुवारी महिन्यात गुहागरच्या समुद्रा किनाऱ्यावर आलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना बागेश्री व गुहा अशी नावं दिली होती. या दोन्ही कासवांना 21 फेब्रुवारी रोजी रेडीओ टॅग करून सॅटेलाईट ट्रान्समीटरशी जोडण्यात आले होते. त्यानंतर 23 फ्रेबुवारी रोजी या कासवांना समुद्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही कासवांचे लोकेशन वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाला सतत घेत असते. 18 जून रोजी बागेश्री हे कासव कन्याकुमारी येथे दिसले होते. त्यानंतर या कासवाने श्रीलंकेकडे प्रवास सुरू केला आहे. दरम्यान 3 जुलै रोजी या कासवाने श्रीलंकेची सागरी हद्द पार केली आहे. भारताच्या दक्षिण टोकाकडे सुरु असणारा या दोन्ही कासविणींचा प्रवास अतिशय उत्सुक्तापुर्ण राहिला आहे. बागेश्री झपाट्याने प्रवास करत असुन तिने याआधी कर्नाटका, केरळ अंतर कापत आता श्रीलंका गाठण्याच्या तयारीत आहे. आता ते गॅले या शहराच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे.



