पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट आज (बुधवार) सकाळी 11 वाजल्यापासून संस्थेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जुलै-ऑगस्ट 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. प्रवेशपत्राच्या प्रिंटवर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का व स्वाक्षरी असणं महत्त्वाचं आहे. तसेच विषय किंवा माध्यम यांमध्ये बदल असल्यास शाळा, महाविद्यालयांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन दुरस्ती करावी. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव याबाबतच्या दुरुस्त्या शाळा, महाविद्यालयाच्या स्तरावर करुन त्याची प्रत विभागीय मंडळाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यायचे आहे.





