व्यसनाच्या आहारी न जाता कुटुंबाला व्यवसानपासून वाचवा | बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे

55

बांदा : दरवर्षी 26 जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. नशेमध्ये अडकलेल्या लोकांचे जीवन वाचवणे, जागरूकता करणे हा या दिवसाचा मुळ उद्देश आहे. जगातील 20 टक्के लोक अमलीपदार्थाच्या अमलाखाली आलेले आहेत. अमलीपदार्थाचे सेवन करून परिवार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे याला विरोध करण्यासाठी विद्यार्थीदशेतच सुरूवात झाली पाहिजे. समाजातील प्रत्येकाने व्यसनाच्या आहारी न जाता कुटुंबाला व्यवसानपासून वाचवा असे आवाहन बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे यांनी केले.

रोणापाल छात्रालयात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन संदर्भात मार्गदर्शन करताना श्री.काळे बोलत होते.

व्यासपीठावर अखिल भारत सेवा अभियानच्या ट्रस्टी माताजी, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, बांदा पोलिस विजय जाधव, बाळकृष्ण गवस, माया जाधव, छात्रालय व्यवस्थापक जिवबा विर, दिशा फाऊंडेशनच्या अध्यक्षा मंगल कामत, दशावतार कलाकार जगदीश मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.काळे म्हणाले की, ज्या घरात अमली पदार्थाच्या आहारी गेलेली व्यक्ती असते त्या घरात आर्थिक समस्यांसोबत मानसिक तणावाची स्थितीही निर्माण होते. सामाजिक व आरोग्यविषयक जागृती-सेवेचे काम करणाऱ्या सामाजिक संस्थाही अमली पदार्थांच्या विरोधात जागृती करण्याचे काम करतात. त्याला आपण साथ दिली पाहिजे. सर्वांनी अशा उपक्रमांत सहभाग घ्यावा असे आवाहन श्यामराव काळे यांनी केले.
मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिवबा विर यांनी केले तर आभार दिशा फाऊंडेशनच्या अध्यक्षा मंगल कामत यांनी मानले.
—–