झरेबांबरमध्ये दोघांच्या घराची कौले काढून चोरी | रोख रकमेसह ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास…!

77

दोडामार्ग : झरेबांबर – गावठणवाडी येथील काजल रमेश सावंत व सीताबाई धरणे या दोघांच्या घरात चोरी झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. छपरावरील कौले काढून अज्ञात इसमाने रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लंपास केला. या घटनांमध्ये रोख रकमेसह एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. याबाबतची फिर्याद काजल रमेश सावंत यांनी दोडामार्ग पोलीसात दिली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, झरेबांबर गावठणवाडी येथील काजल सावंत यांच्या घराचे किचनच्या छपराची कौले काढून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यांचे १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे जोड व रोख १६ हजार लंपास केले. तसेच त्यांचे शेजारी सिताबाई धरणे यांच्याही घराची कौले काढून घरातील रोख १६ हजार व सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत काजल सावंत यांनी आज दोडामार्ग पोलीसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात भादंवि कलम ३८०, ४५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत.