अकोला : शहरातील जुने शहर भागात समाजमाध्यमातील पोस्टवरून शनिवारी रात्री दंगल उसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. शहरातील चार पोलीस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू केली. खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा रविवार दुपारपासून बंद करण्यात आली आहे. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून तणावपूर्ण शांतता आहे.
समाजमाध्यमावर शनिवारी रात्री एक पोस्ट प्रसारित झाली होती. या पोस्टवरून एका विशिष्ट धर्मीय लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. १०० ते १५० जणांच्या जमावाने रामदासपेठ पोलीस ठाण्यात एकत्र येऊन तक्रार दाखल केली. दुचाकीवरून फिरत जमावाने जोरदार नारेबाजी करून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाकडून जुने शहरात प्रचंड हैदोस घालण्यात आला.




