मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे रविवार, ७ मे रोजी साने गुरुजी विद्यालय, दादर येथे महाराष्ट्र अंनिस चे कार्यकर्ते, देणगीदार, हितचिंतक, समविचारी व सर्व नागरिकांसाठी संध्याकाळी चार ते सात या वेळेत स्नेह-संमेलन आयोजित केले आहे. या वेळी ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम’ या सुप्रसिद्ध रिंगणनाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. या प्रयोगानंतर उपस्थितांसोबत महाराष्ट्र अंनिसची चळवळ, उपक्रम व भूमिका या संदर्भात मुक्त संवाद व चर्चासत्र सुद्धा आयोजित केलेले आहे.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनानंतर महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या दिग्दर्शनाखाली बसवलेले ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या रिंगणनाट्टयाने महाराष्ट्रभर महाराष्ट्र अंनिस चा विचार प्रभावीपणे पोचवण्याचे काम केले. ‘चला हवा येवू द्या’ या मालिकेमध्ये सुद्धा या नाटकाचा प्रयोग झाला.
मुंबईमध्ये खूप दिवसांनंतर या सुप्रसिद्ध रिंगणनाट्याचा प्रयोग होणार आहे. मुंबईतील सर्व नागरिकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता येवू शकेल. सोबतच महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याची सुद्धा संधी मिळणार आहे.
नोंदणीसाठी (7738181177) या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.





