बारसू रिफायनरी बाबत शरद पवारांनी उदय सामंतांना दिला ‘हा’ सल्ला…!

रत्नागिरीतल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे. याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत असून याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. असे प्रकल्प सुरू करताना सरकारने स्थानिकांशी चर्चा करावी, असे ते म्हणाले. उदय सामंतांबरोबरच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांविरोधात पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे, अशी आमची तक्रार होती. त्याबाबत आज उदय सामंत यांनी माहिती दिली. अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं ते म्हणाले. तसेच बारसूमध्ये रिफायनरी प्रस्तावित असून सध्या येथील मातीचे परीक्षण केल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यावर मी त्यांना हे काम सध्या हे थांबवून विरोधक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी उद्या बारसूमध्ये यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले”, असे शरद पवार म्हणाले.